मालमत्ता करात वाढ नाही, पण पाणी महागणार!
ठाणे, दि. ११ (प्रतिनिधी) - कोणतीही नवी घोषणा न करता जुन्या प्रकल्पांनाच चालना देणारा ठाणे महापालिकेचा ३ हजार ७८० कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांना सादर केला. मालमत्ता करात कोणतीही वाढ करण्यात आली नसून तब्बल पाच वर्षांनंतर पाणीपट्टीत ५० ते ६० टक्के वाढ केली आहे. त्यामुळे पाण्यासाठी ठाणेकरांना जादा पैसे मोजावे लागणार असले तरी पालिकेच्या तिजोरीत २२५ कोटी रुपयांची भर पडेल. मंदीचा फटका पालिकेच्या अर्थसंकल्पाला देखील बसला असून त्यामुळे सुमारे ३०० कोटींचे नुकसान झाले आहे. तलावांचे शहर म्हणून अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ठाणे शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू असून मेट्रो, सॅटिस, रस्ता रुंदीकरण, क्लस्टरजलवाहतूक, खाडीकिनाऱ्यांचे सौंदर्याकरण, चौपाटी असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. हे सर्व प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्धार प्रभारी आयुक्तांनी केला. । ठाणेकरांसाठी विकासाचा 'रोड मॅप'.